बाल संगोपन केंद्र
कोंढव्याच्या निसर्गरम्य परिसरात ट्रस्टने 20 ऑक्टोबर 1985 साली बालसंगोपन केंद्राची स्थापना केली. समाजानं ज्या वर्गाचं अस्तित्व नाकारलं आहे, अशा देवदासींच्या, निराधार-निराश्रित मुला-मुलींना डोळ्यांसमोर ठेवून, त्यांना आपलंसं करण्यासाठी, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या केंद्राची निर्मिती झाली.
बदलत्या सामाजिक परिस्थितीत, देवदासींच्या मुलांबरोबरच अन्य वर्गांतल्या गरजू आणि अनाथ मुलांनाही ट्रस्टनं येथे प्रवेश द्यायला सुरुवात केली आहे. कागद, काच, पत्रा वेचणार्या अनेक महिलांच्या मुलांचं पालकत्वही या केंद्रानं स्वीकारलं आहे.
या मुलांना वाईट संगत लागू नये, ती सुशिक्षित, सुसंस्कृत व्हावीत, स्वतःच्या पायावर उभं राहण्याइतकं त्यांनी सक्षम बनावं आणि समाजात एक स्थान मिळवावं, हाच केंद्राचा संकल्प आहे.
बाल संगोपन केंद्रातल्या मुलांसाठी ई-लर्निंगचीही सोय ट्रस्टनं केली आहे. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळण्यासाठी कवायत, खेळ, मनन, पठन, संस्कारवर्ग, अभ्यासवर्ग असे अनेक उपक्रम केंद्रात राबवले जातात. अभ्यासात कच्च्या किंवा वर्तणुकीत समस्या असलेल्या मुलांसाठी येथे समुपदेशकही नेमले आहेत. त्याद्वारे, या मुलांचं समाजवर्तन सुधारावं, याकडं विशेष लक्ष दिलं जातं.
गणरायाच्या दान-देणगीतून जमा होणारा लक्षावधी रुपयांचा निधी येथील मुलांच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सर्वांगीण विकासासाठी खर्च होत आहे. मुलांच्या आवडीनुसार व्यावसायिक शिक्षण देऊन त्यांचं भवितव्य घडवण्याचं कामही ट्रस्ट करतं.
या केंद्रातील अनेक मुलं आज स्वकर्तृत्वावर समाजात ताठ मानेनं वावरत आहेत. या केंद्रातून संस्कारांची शिदोरी घेऊन बाहेर पडलेला सुनील शेरेकर आज एका मोठ्या हॉटेलमध्ये शेफ आहे, तर याच केंद्रात घडलेला आणि त्यामुळेच बारावीत बोर्डात पहिला आलेला वसीम पठाण एका बहुराष्ट्रीय (एमएनसी) कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत आहे. बाल संगोपन केंद्र हेच घर असलेली अशा आणखीही यशोगाथा आहेत.
ट्रस्टचे हे बालसंगोपनातील विधायक आणि रचनात्मक कामकाज पाहण्यासाठी देशातील आणि परदेशातील अनेक मान्यवरांनी येथे भेटी दिल्या आहेत.
Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….