भक्तांसाठी विमा आणि मंदिर परिसर विमा संरक्षण
120 वर्षांहून अधिक काळाची परंपरा असलेला श्रींचा उत्सव हा पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू. दरवर्षी लाखो भाविक देशाच्या कानाकोपर्यांतून या काळात बाप्पाच्या दर्शनाला येतात. विद्युत रोषणाई, पौराणिक-ऐतिहासिक देखावे, सजावट पाहण्यासाठी येणार्यांची या गर्दीत भरच पडते. दरवर्षी ही संख्या वाढतच आहे. गर्दीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नयेत, यासाठी पोलिस यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत असतेच. पण ट्रस्टनंही या भक्तांच्या सुरक्षिततेचा स्वतंत्रपणानं विचार करून त्यांचा विमा उतरवला आहे. उत्सव काळात होणार्या या गर्दीचे निमित्त साधून समाजकंटक किंवा अतिरेक्यांनी त्यांचे कुटील डाव साधू नयेत, यासाठी पुरेपूर दक्षता घेतली जाते. तरीही या उत्सवात सहभागी होणार्या पुण्यातील आणि राज्यभरातून पुण्यात येणार्या लाखो भक्तांचे संरक्षण व्हावे, यासाठी ट्रस्टने विशेष काळजी घेतली आहे.
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महानगरांतल्या भाविकांसाठी अभयदान म्हणून 50 कोटी रुपयांचा विमा ट्रस्टनं उतरवला आहे. 2009पासून ट्रस्टनं गणेशोत्सव काळातल्या बारा दिवसांसाठी हा विमा उतरवायला सुरुवात केली. अतिरेक्यांच्या कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यात एखादी व्यक्ती मृत झाल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना औषधोपचारांसाठी पंचवीस हजार रुपयांची मदत या विम्याद्वारे देण्याची व्यवस्था ट्रस्टने केली आहे.
दहशतवाद्यांनी देशातली धार्मिक स्थळे लक्ष्य केल्यापासून आणि विशेषतः पुणे शहरही त्यांच्या हिट लिस्टवर असल्यामुळे सरकारने दगडूशेठ मंदिरासह सगळ्याच महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना सुरक्षा पुरवली आहे. तरीही ट्रस्टनंही या धोक्याची गंभीर दखल घेऊन मंदिराच्या एक किलोमीटर परिसरापर्यंतच्या नागरिकांचा पाच कोटी रुपयांचा अपघात विमा काढला आहे. ट्रस्टनं हा विमा 2011पासून नियमितपणे काढण्यास सुरुवात केली आहे.
Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….Content Goes Here….