ज्ञानवर्धन अभियान
गुणवत्ता आहे, पण त्या गुणवत्तेला कोंदण घालणारे मार्गदर्शक आणि त्याला पूरक वातावरण ज्यांच्या नशिबी नाही, अशा वर्गातल्या मुला-मुलींसाठीचा जयगणेश ज्ञानवर्धन हा उपक्रम. त्याला निमित्त ठरलं ते 2009-10च्या काळात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं वाढलेलं आत्महत्यांचं प्रमाण. या विद्यार्थ्यांसाठी आपण काही मदत करू शकतो का, असा विचार त्यातूनच सुरू झाला. ट्रस्टनं या आत्महत्यांमागची कारणं शोधायचं ठरवलं. गुणवत्ता आहे, पण ती जोपासली जात नाही, अशी मुलंच आत्महत्या करणार्यांमध्ये जास्त असल्याचं ट्रस्टच्या पाहणीतून निष्पन्न झालं. यावर तात्पुरती मलमपट्टी करणं योग्य न वाटल्यानं ट्रस्टनं आपल्या परीनं दीर्घकालीन उपायांचा शोध सुरू केला. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडला, तर कुठल्याही परिस्थितीचा सामना करायला ही मुलं तयार होतील आणि नकारात्मक विचार सोडून देतील, असा निष्कर्ष निघाला. त्यामुळे, या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा पुरवठा आणि मार्गदर्शनाबरोबरच संस्कारवर्ग, समुपदेशन, आरोग्य तपासणी अशा सोयीही पुरवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करायचा, हा विचार पुढं आला. त्यातूनच जय गणेश ज्ञानवर्धन अभियान आकाराला आलं. परिस्थितीमुळे रात्रशाळेत शिकणार्या मुलांनाही ट्रस्टनं नंतरच्या टप्प्यात या अभियानाशी जोडून घेतलं.
सुरुवातीला ट्रस्टनं या मुलांसाठी संस्कार वर्गांची आखणी केली. परंतु, नकारात्मक मानसिकता बदलायची तर त्यासाठी समुपदेशनाची आवश्यकता आहे आणि उत्तम आरोग्यही तेवढंच गरजेचं आहे. यासाठी या दोन्ही व्यवस्थांचाही या योजनेत समावेश केला गेला. या योजनेत सहभागी असणार्या विद्यार्थ्यांसाठी निकष म्हणून एकतर तो गुणवान असावा, तसेच त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असावी, असं ठरलं. या निकषांच्या आधारे विद्यार्थी निवडण्याची जबाबदारी शाळांवरच सोपवण्यात आली. पहिल्याच वर्षी दहावीच्या निकालातून या योजनेचं यश पाहायला मिळालं. बावीसपैकी नऊ मुलांना 85 टक्क्यांच्या पुढं गुण मिळाले. त्यांत हॉटेलमध्ये काम करणारा, रिक्षावाल्यांचा मुलगा, पेपर टाकणारा मुलगा, भांडीवालीचा मुलगा अशी दबलेल्या वर्गांतील मुलं बहुसंख्य होती. बाकीचीही मुलं पन्नास-साठ टक्क्यांपर्यंत गेली होती. बारावीचा निकालही शंभर टक्के लागला.
शिक्षणाबरोबरच संस्कार, आरोग्यालाही महत्त्व देणार्या आणि शैक्षणिक प्रगतीबरोबरच जबाबदार नागरिकही घडवणार्या या योजनेचे यश हे ट्रस्टच्या उपक्रमशील वृत्तीला बळ देणारे ठरले आहे.
